Ad will apear here
Next
मुंबई पर्यटन : वांद्रे परिसर
‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात मुंबईतील वांद्रे परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती घेऊ या.
...........
आजच्या भागात मुंबईतील मिठी नदीच्या उत्तरेकडील भाग पाहू या. हा भाग साष्टी बेटात येतो. दक्षिणेस मिठी नदी व उत्तरेस उल्हास नदी, पूर्वेसही उल्हास नदीची शाखा व पश्चिमेस अरबी समुद्र. या भागाला ऐतिहासिक वारसा आहे. साष्टी बेटावर सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याची दुसऱ्या शतकात सत्ता होती. सन ९२० ते १३७८ या कालावधीत यादवांची सत्ता होती. त्यानंतर गुजरातच्या सुलतानांनी हा भाग ताब्यात घेतला. त्यानंतर १६व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी तो ताब्यात घेतला. तो चिमाजी अप्पांनी १७३९मध्ये हल्ला करून मराठा साम्राज्यास जोडला. सन १७७४मध्ये पुण्यातील नारायणरावांच्या खुनानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा घेऊन इंग्रजांनी ठाण्यापर्यंतचा भाग ताब्यात घेतला. तो १९४७पर्यंत त्यांच्या ताब्यातच राहिला. ब्रिटिशांनी व्यापार आणि सत्ता विस्तारासाठी मुंबईचा चांगला उपयोग करून घेतला व मुंबईची भरभराट होत गेली. रोजगाराच्या निमित्ताने सर्व भारतातून लोक येथे येऊ लागले. मुंबई उद्योगासाठी व राहण्यासाठी अपुरी पडू लागली. निवांतपणासाठी श्रीमंत लोकांनी मिठी नदीच्या पलीकडे वस्ती करण्यास सुरुवात केली. 

अरबी समुद्राला लागून वांद्रे, खार, जुहू, मढ, गोराई हा भाग आहे. वांद्रे, जुहू, खार हे भाग श्रीमंत वस्तीचे समजले वाजतात. चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते, क्रिकेटपटू, उद्योगपती, राजकारणी यांची वसतिस्थाने आहेत. 

वांद्रे/बांद्रा : बंदरगाह या उर्दू शब्दावरून बंदरचे वांद्रे झाले असावे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. सन १५३४मध्ये, डिएगो दा सिल्विरा या पोर्तुगीज आरमाराच्या कॅप्टनने येथे प्रवेश केला आणि तेथील कोळी वस्ती नष्ट केली आणि हा भाग प्रथमच पोर्तुगीज आधिपत्याखाली आला. त्याचबरोबर धर्मप्रसारही केला गेला. कॅथोलिक धर्मगुरू फादर मॅन्युएल गोम्स यांनी येथे चर्चचे महत्त्व वाढविण्यात मोलाची भूमिका बजावली होती. सन १५८०मध्ये त्यांनी दोन हजार मच्छिमारांना बाप्तिस्मा दिला. फादर गोम्स यांनी सेंट अँड्र्यू चर्चदेखील स्थापन केले. १७७५मध्ये सुरतच्या कराराने वांद्रे हा इंग्रजी प्रांताचा भाग झाला, परंतु पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाच्या वेळी १७७९मध्ये मराठ्यांकडे परत गेला. 

सन १८०२मध्ये बाजीराव (दुसरा) याने इंग्रजाशी बासेन (वसई) करारावर स्वाक्षरी केली आणि पुन्हा वांद्रे ब्रिटिशांच्या स्वाधीन केले आणि ते १५ ऑगस्ट १९४७पर्यंत ब्रिटिशांच्या ताब्यात राहिले. सन १८७६मध्ये वांद्रा गावाला नगरपालिकेचा दर्जा देण्यात आला. त्या वेळी वांद्रेमध्ये शेर्लि, मल्ला, राजन, कातवडी, वरोदा, रणवार, बोरान, पाली आणि चुईम अशी अनेक गावे समाविष्ट झाली. सन १९५०मध्ये मुंबई महानगरात त्याचा समावेश झाला. १२ एप्रिल १९६७ रोजी विरार ते मुंबईदरम्यान दररोज एक ट्रेनसह पहिल्या रेल्वेसेवेचे उद्घाटन झाले. सहा वर्षांनंतर येथे दररोज २४ गाड्या थांबू लागल्या. आता वांद्रे येथे दररोज ९४० गाड्या थांबतात. 

बांद्रा किल्ला

बांद्र्याचा किल्ला :
इतिहासकाळात माहीमच्या खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारामुळे या भागाला खूप महत्त्व होते. या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी १६४० साली ‘बांद्र्याचा किल्ला’ बांधला. या किल्याचे मूळ नाव कॅस्टिला डी अगुआदा (Castella de Aguada) असे होते. या किल्ल्यावरून वांद्रे-वरळी सागरी पुलाचे सुंदर दर्शन होते. पुरातत्त्व विभागाने या किल्ल्याची चांगली देखभाल ठेवली आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच एक पोर्तुगीज शिलालेख दिसून येतो. हा किल्ला समुद्रसपाटीपासून २४ मीटर (७९ फूट) उंचीपर्यंत आहे. बांद्रा किल्ल्याची पुरातत्त्व विभागाने डागडुजी केलेली आहे. त्यामुळे किल्ला फार सुंदर दिसतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोर्तुगीज भाषेत एक शिलालेख कोरलेला दिसून येतो. या प्रवेशद्वारापासून किल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्यात बांद्रा लँड अँड गार्डन या एका स्थानिक संस्थेने उभारलेली बाग आहे. किल्ल्यात जुने काही अवशेष उरलेले नाहीत. माहीमच्या खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारामुळे ह्या भागाला खूप महत्त्व होते. पोर्तुगीज व ब्रिटिश यांच्यामध्ये त्यावेळी प्रचंड व्यापारी स्पर्धा होती. त्यामुळे पोर्तुगीजांनी मुख्य समुद्रावरून होणाऱ्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी सन १६४०मध्ये टेहळणी करणे व गोड्या पाण्याच्या साठ्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली. १७३९ सालच्या चिमाजी अप्पांनी वसईवर केलेल्या स्वारीत ब्रिटिशांनी हा किल्ला पाडून टाकण्याचा सल्ला पोर्तुगीजांना दिला आणि त्याप्रमाणे १७३९च्या मार्च महिन्यात हा किल्ला पोर्तुगीजांनी पाडून टाकला. 

माउंट मेरी चर्च

माउंट मेरी चर्च :
पोर्तुगीजांनी सन १६४०च्या सुमारास माउंट मेरीचे कॅथोलिक चर्च बांधले होते. सन १७३८मध्ये मराठ्यांनी त्यांच्या हल्ल्याच्या वेळी चर्च नष्ट केले गेले. त्या वेळी समुद्रात टाकलेली व्हर्जिनची मूर्ती समुद्रातून मच्छिमारांकडून शोधून मिळविण्यात आली व तात्पुरत्या स्वरूपात सेंट अँड्र्यूज चर्चमध्ये तात्पुरती स्थापित केली गेली. त्यानंतर सन १७६१मध्ये नव्याने बांधलेल्या माउंट मेरीच्या चर्चमध्ये स्थापन करण्यात आली. सन १९०४मध्ये बांधलेल्या चर्चचे आर्किटेक्ट शाहपूरजी चंदाभॉय होते. जमसेटजी जीजीभॉय यांनी माउंट मेरी चर्चकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे बांधकाम करून दिले होते. म्हणून त्याला बोमनजींच्या पायऱ्या असे म्हणतात. येथे ‘बांद्रा फेस्टिव्हल’ म्हणून मोठा उत्सव साजरा होतो. 

वांद्रे तलाव

वांद्रे तलाव :
हा तलाव ‘मोठा तलाव’, ‘कमळ तलाव’ म्हणून ओळखला जायचा. जवळ असलेल्या नौपाडा गावातील श्रीमंत कोकणी मुस्लिम व्यक्तीने हा तलाव बांधला आहे. हा तलाव एस. व्ही. रोडवर असून, तिन्ही बाजूंनी याला रेलिंग करण्यात आले आहे. एस. व्ही. रोडच्या कडेला पाम झाडे लावलेली असून, बसण्याची सोय केलेली आहे. त्याला विवेकानंद सरोवर असे नाव देण्यात आले आहे. ९०च्या दशकात या तलावात पॅडल बोटिंग सुविधा आणि मत्स्यपालनाचे उपक्रम राबविले होते. परंतु त्यानंतर ते बंद आहेत. हा तलाव महापालिकेच्या ताब्यात आहे. 



वांद्रे-कुर्ला संकुल :
दक्षिण मुंबई महानगर भागात दाट वस्ती व रहदारी असल्याने, वाढत चालल्याने, उपनगरामध्ये मुंबईबाहेरील व्यवसाय जिल्हा बनविण्याची गरज व मागणी वाढली. त्यानुसार २०००च्या दशकात, शहराच्या पूर्व भागात वांद्रे-कुर्ला सीमेजवळ मिठी नदी परिसरातील जमीन संपादित करण्यात आली. तेथे मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले. या नव्याने स्थापन झालेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात ब्लॅकस्टोन, गुगल आणि अॅमेझॉन यांसारख्या अनेक इक्विटी आणि तंत्रज्ञान कंपन्यांना आकर्षित करण्यात आले आहे. मुंबईच्या नरिमन पॉइंट आणि कफ परेड भागात झालेल्या व्यवसायाचे विकेंद्रीकरण करून गर्दी कमी करणे, तसेच रोजगाराच्या संधी वाढविणे हा या संकुलाचा उद्देश आहे. अशा प्रकारचे नव्याने वाढविलेले पहिलेच व्यापारी संकुल आहे. येथे अनेक राष्ट्रीयीकृत, तसेच शेड्युल्ड बँकांची मुख्यालये, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, सेबी, नाबार्ड हेड ऑफिस, आयएल अँड एफएस, अॅमेझॉन डॉट कॉम, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, डो केमिकल्स, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, फॉर्च्युन २००० आणि जिओगार्डन, मुंबई क्रिकेट असोसिएशन, युनायटेड स्टेट्स मुंबई दूतावास आणि ब्रिटिश उप-उच्चायुक्त यांची मुख्यालये आहेत. संपूर्ण बीकेसीमध्ये अंदाजे चार लाख लोक विविध कार्यालयांमध्ये काम करत आहेत. सन १९७७मध्ये वांद्रे-कुर्ला संकुलाच्या नियोजन व विकासासाठी एमएमआरडीएची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. यात मिठी नदी, वाकोला नाला आणि माहीम खाडीच्या दोन्ही बाजूंनी एकत्रित ३७० हेक्टर जमीन आहे. पाण्याचा निचरा होण्याच्या व्यवस्थेसह यावर रुंद रस्ते विकसित करण्यात आले आहेत. 

वांद्रे कला पथ

वांद्रे कला पथ :
वांद्रे यथील चॅपल रोड आणि वेरोनिका स्ट्रीटच्या आसपासच्या भागात भित्तिचित्रणाची रेलचेल असलेला अनोखा कला पथ आहे. येथे विविध प्रकारची भित्तिचित्रे असतात. त्यात लक्षवेधक कार्टून, वारली पेंटिंग, छाप, व्यक्तिचित्रे इत्यादींचा समावेश आहे. गोमेझसारख्या जगभरात नामांकित कलाकारांनी या भिंतींवर कामे तयार केली आहेत. सेंट + आर्ट मुंबई, बॉलिवूड आर्ट प्रोजेक्ट आणि धारावी आर्ट रूम अशा काही संस्था आहेत, ज्या कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) पाठबळ आहे. वांद्रे रेक्लेमेशन येथील एमटीएनएल इमारतीवरील दादासाहेब फाळके यांच्या १२० बाय १५० फूट पोर्ट्रेटचा समावेश आहे. २०१४मधील उत्सवात रणजित दहिया (बॉलिवूड आर्ट प्रोजेक्टमधील) मुनीर बुखारी आणि नीलेश खराडे यांच्यासह इतर कलाकारांनी मुंबई फेस्टिव्हलचा भाग म्हणून तयार केले होते. म्युरलचे अनावरण अमिताभ बच्चन आणि पीयूष पांडे यांनी केले होते. हे आशियातील सर्वांत मोठे भित्तिचित्र आहे. अशा प्रकारची अनेक चित्रे बघताना मजा येते. 



बँडस्टँड बीच :
वांद्रे किल्ल्याजवळच हा बीच आहे. येथील सूर्यास्ताचे चित्र खूपच छान दिसते. मोकळी हवा, पार्किंगची चांगली व्यवस्था, फॅशनेबल माणसांची गर्दी यांमुळे येथे संध्याकाळी उत्साही वातावरण असते. चित्रपट दिग्दर्शक मेहबूब खान यांनी १९५४मध्ये येथे मेहबूब स्टुडिओची स्थापना केली. लवकरच हा परिसर भारतीय चित्रपट उद्योग, बॉलिवूड यांचे केंद्र बनला. येथे सन १९७०च्या दशकात रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू करण्यात आला. बीबीआरटी वांद्रे बँडस्टँड प्रोमोनेड मुंबईतील १७ पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आले आहे. सुंदर बाग आणि स्वच्छंद पदपथ असलेली ही मोकळी जागा विविध खासदारांनी दिलेल्या निधीतून आर्किटेक्ट पी. के. दास यांच्यासह बीबीआरटी लँड्स एंड एरिया आणि बीबीआरटी सीनियर सिटीझन्स पार्क व वांद्रे बँडस्टँड रेसिडेन्ट्स ट्रस्ट या रहिवाशांच्या संघटनेच्या प्रयत्नातून सन २०००पासून समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसाठी ही एक विनामूल्य सुविधा पुरविली आहे. 

बँडस्टँड बीच

जॉगर्स पार्क :
मुंबईच्या वांद्रे येथील उद्यानासमवेत समुद्रकिनारी जॉगिंग ट्रॅक आहे. हे कार्टर रोडच्या ओटर्स क्लबच्या पुढे आहे. हे उद्यान २ मे १९९० रोजी लोकांसाठी उघडले गेले होते आणि आठवड्यात दोन हजारांहून अधिक अभ्यागत येतात आणि रविवारी त्यांची संख्या दुप्पट होते. त्याचा जॉगिंग ट्रॅक ४०० मीटर लांबीचा आहे. यात चालण्यासाठी मातीची पट्टी आणि चालणे किंवा जॉगिंगसाठी दोन पक्के ट्रॅक आहेत. या उद्यानाच्या विकासाचे श्रेय शहरातील दिग्गज हॉकी प्रशिक्षक आणि माजी नगरसेवक ऑलिव्हर अँड्रेड यांना दिले जाते. जॉगर्स पार्कची संकल्पना त्यांचीच. त्यांनी डम्पिंग ग्राउंडच्या (कचरा डेपो) रहेजा, लोखंडवाला आणि रिझवी बिल्डर्सच्या आर्थिक मदतीने डम्पिंग ग्राउंडमधून जॉगिंग ट्रॅकमध्ये जागेचे रूपांतर केले. 

सेंट अँड्र्यूची पॅरिश स्कूल : ही शाळा बांद्रा येथे फ्रान्सिस्को डी मेलो यांनी सन १७८०मध्ये स्थापन केली. मुंबईमध्ये इंग्रजांनी वांद्रे येथे स्थापन केलेली ही पहिली शाळा आहे. त्याचे नाव सेंट अँड्र्यू हायस्कूल झाले. 

बांद्रा येथील उद्याने : अल्मेडा पार्क, प्राइम टाइम फाउंटन, रोटरी पार्क, एएलएम पार्क, सेंट अँड्र्यूज टर्फ पार्क, बीबीआरटी, लहान मुलांसाठीचे उद्यान अशी अनेक उद्याने या भागात विरंगुळ्यासाठी उपलब्ध आहेत. 

कसे जाल वांद्रा/बांद्रा भागात? 
वांद्रा पश्चिम द्रुतगती मार्गावर आहे. पश्चिम रेल्वेवरील मुख्य व उपनगरी गाड्यांची सतत ये-जा चालू असते. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या सदरातील लेख या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZSCCF
Similar Posts
मुंबई पर्यटन : माहीम, सायन, धारावी ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात मुंबईतील दादर, परळ वगैरे भागाची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या माहीम, सायन (शिव) आणि धारावी.
मुंबई पर्यटन : राजभवन, वाळकेश्वर आणि परिसर... ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण मुंबईतील गिरगाव आणि मलबार हिल परिसरातील काही ठिकाणे पाहिली. आजच्या भागात मलबार हिलवरील वाळकेश्वर, राजभवन यांसह अन्य ठिकाणांची माहिती घेऊ या.
दक्षिण मुंबईतील विविध बाजार ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात आपण माहिती घेऊ या दक्षिण मुंबईतील विविध बाजारांची. त्यात मनीष मार्केटपासून बुक स्ट्रीटपर्यंत आणि चोरबाजारापासून जव्हेरी बाजारापर्यंतच्या विविध बाजारांचा आणि परिसरातील मंदिरांचा समावेश आहे.
मुंबई पर्यटन : मरीन ड्राइव्ह परिसर ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण मुंबईचा पूर्व किनारा म्हणजेच बंदरे असलेल्या भागाची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील भागाची म्हणजेच मरीन ड्राइव्ह परिसराची....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language